Menu


President Message :::

President
Shri. kamalkishorji kabra

सर्वप्रथम आदर्श एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक माझे वडील बंधू स्व. सेठ श्री. घनशामदासजी काबरा, स्व. श्री. नागनाथ अप्पा सराफ, स्व. श्री. श्रीराम गुरु शर्मा ह्यांना वंदन करून, तसेच सर्व माझे सहकारी संस्था सदस्य, प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक, समस्त शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी ह्यांना नमस्कार. मित्रहो आपली सर्वांची आदर्श एज्युकेशन सोसायटी हि संस्था १९६७ साली स्थापन झाली. हि संस्था आपल्या नावाप्रमाणेच शैक्षणीक व सामाजिक कार्य करीत असताना काही कारणांमुळे (जे आपण सर्वजण जाणताच ) ह्या संस्थेची वाढ खुंटली. आता नवीन व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळात आपली संस्था पुनश्च: एकवार आपले नावलौकिकास अनुसरूनच कार्य करेल याची मी आपणास ग्वाही देतो. आपण सर्व “आदर्श” ह्या एका कुटुंबाचे सदस्य आहोत. त्या अनुषगाने मी आपणास काही सांगू इच्छितो. कोणत्याही कुटुंबाच्या प्रगतीत त्या कुटुंबातील सर्व सदस्याचे योगदान हे महत्वपूर्ण असते. तसेच आपल्याला आपल्या आदर्श ह्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या सर्वांचे योगदान हे महत्वपूर्ण आहे. आज आपल्या परिसरातील हजारो पालकांनी आपल्या कुटुंबावर विश्वास टाकत आपल्या पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्यावर जबाबदारी सोपविली आहे. आपण त्या सर्व पालकांचे आभार मानून त्यांच्या पाल्यांना योग्य व उच्चतम शिक्षण देवून त्यांचा विश्वास सार्थ ठरवूया. ह्यासाठी सर्वांनी शिस्त, वेळेचे बंधन व वरीष्ठाचे आदेश पाळून आपल्या कुटुंबातील शिक्षण संस्था मध्ये उपलब्ध सोयी सुविधा वापरीत त्यांना संस्कारक्षम, जीवनोपयोगी दर्जेदार शिक्षण सेवा पुरवू अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. तसेच पालक व विद्यार्थी हे सुद्धा आमच्या संस्थेचे अविभाज्य घटक आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा महाविद्यालयीन शिस्त पाळीत गुरुजनांचा आदर करीत आपल्या सहकाऱ्यासमवेत सौजन्याची वागणूक ठेवावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या शैक्षणीक कार्याचा वेळोवेळी आढावा घेवून आपल्या काही अडीअडचणी किंवा महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी काही सूचना असल्यास मला किंवा व्यवस्थापनास व्यक्तिश: संपर्क करावा. जसे कुटुंबाच्या प्रगतीत आई वडिलाची म्हणजे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते त्याचप्रमाणे संस्था हि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पडेल अशी मी आमच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने ग्वाही देतो. ज्याप्रमाणे पालकांना आपली सर्व मुले हि समान असतात तसेच आम्हालाही आपण सर्वजन सारखेच आहात. त्यामुळे आपण मनात कोणतीही भेदभावाची, व्दषाची किंवा न्यूनगण्डाची भावना न बाळगता आपण सर्वांनी कुटुंबाच्या उन्नतीसाठी एकजुटीने आपल्या सर्व सहकाऱ्या सोबत झटूया. पुनश्च: एकवार आपले सर्वांचे आभार मानून आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतो. जय हिंद... जय महाराष्ट्र... जय आदर्श...